दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे:-
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रशासकीय पातळीवरील न सुटलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, या सुनावणीसाठी सोमवारी महापालिकेत बोलावलेल्या ४० ते ५० नागरिकांना तब्बल चार तास आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ताटकळत ठेवण्यात आले. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नव्हती. तसेच पिण्यासाठी पाणीही नव्हते.
लोकशाही दिनासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना सकाळी साडेदहा वाजता वेळेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. तसेच वेळ निघून गेल्यास पुन्हा वेळे बाबत दरडावण्यात आले. त्यामुळे, सकाळी साडेनऊ वाजेपासूनच नागरिकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर गर्दी केली. मात्र, त्यानंतर तब्बल चार तासांनी म्हणजे दुपारी अडीच वाजता नागरिकांना सुनवाणीसाठी बोलविण्यात आले. नागरिकांचे केवळ अर्ज घेऊन त्यांना बोलू ही न देता केवळ अर्ध्या मिनिटात बाहेर काढत तीन वाजता हा लोकशाही दिन गुंडाळण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कामे करायची नव्हती तर हा शो कशासाठी केला असे ते बोलत होते.