
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात 2014 ते 2019 या काळात देशद्रोहाचे 326 गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
राणा दाम्पत्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून कांगावा करणाऱ्या भाजपला याद्वारे त्यांनी हा आकडेवारीचा आरसा दाखवला आहे.
सचिन सावंत यांनी ही आकडेवारी ट्विट करताना सांगितले की, केंद्रातील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2019 नंतर दाखल झालेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांची संख्या अद्याप जाहींर करण्यात आलेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, मला राज्यातील भाजप नेत्यांना आठवण करून द्यायची आहे राणा दांपत्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास पुरेसे कारण नाही, या न्यायालयाच्या टिप्पणीवर जे आज आनंदोत्सव साजरा करीत आहेत त्यांनी मोदींच्या काळात दाखल झालेल्या या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे नजर टाकावी.
नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलल्याबद्दल देशद्रोहाचे एकूण 149 आणि (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री) योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोलल्याबद्दल 144 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ते दीड वर्ष तुरुंगात आहेत.
मोदी सरकारने देशभरात दहशत पसरवली आहे, पण भाजप मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडी सरकारला क्रूर आणि अत्याचारी म्हणतो, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. काही लोक काही दिवस तुरुंगात असल्याने एवढी ओरड होत आहे, पण कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी जे वर्षानुवर्षे तुरुंगात आहेत, त्यांचे काय, असा सवालही त्यांनी केला.