दै.चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई : ऊस तोडणीसाठी परळी तालुक्यातून कर्नाटक राज्यात मजूर घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंबाजोगाई रोड वर धारोबा घाटात दीडशे फूट खोल दरीत कोसळली.यावेळेस अपघातात ट्रॉलीत बसलेली ऊस तोड कामगार महिला जागीच ठार झाली तर अन्य चार जण जखमी आहेत. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दि.17 सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झाला.दरवर्षीप्रमाणे सध्या ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या कामगारांची लगबग सुरू आहे असोला आंबा येथील मुकदमा च्या माध्यमातून परिसरातील असोला आंबा तांडा,दौनापूर येथून काही कामगार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी रविवारी दुपारी निघाले होते.ते अंबाजोगाई रस्त्यावरील धारोबाच्या घाटात आले असता ट्रॅक्टरच्या हेड ला जोडणारी पिन निखळल्याने ट्रॉली बाजूला निघाली आणि शेजारच्या दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्रॉलीत बसलेल्या सागरबाई सुंदर जाधव वय 35 रा.असोला आंबा तांडा ता. परळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सुमित्रा केशव राख वय 26 ,मुंजाहरी केशव राख वय 6 दोन्ही राहणार दौनापूर ता. परळी,गंगुबाई चव्हाण वय 50,नेहा विलास जाधव वय 5 दोन्ही राहणार आसोला आंबा तांडा ता. परळी हे गंभीर जखमी झाले.आवाज ऐकून जमा झालेल्या ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वा रा ती रुग्णालयात दाखल केले सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी गोंधळ सुरू केल्याने रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र उपस्थित सुरक्षारक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणली.