दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : अतिक्रमणविरोधी कारवाईत महापालिकेच्या पथकाने ४२ डझन हापूस आंबे जप्त केले होते. मात्र दंड भरल्यानंतर केवळ ७ डझन आंबे मिळाल्याची तक्रार आंबे विक्रेत्याने चतु:शृंगी पोलिसात केली आहे. बाकीचे ३५ डझन आंबे गेले कोठे ? कोणी खाल्ले? महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून शहरात अनधिकृत व्यवसाय करणार्यांविरोधात कारवाई केली जाते.
कारवाईमध्ये जप्त केलेले साहित्य दंड भरल्यानंतर परत दिले जाते. अशाच प्रकारे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १६ मे रोजी सूस रस्त्यावर अनधिकृतपणे हापूस आंबे विकणार्या टेम्पोवर कारवाई केली. या कारवाईत टेम्पोतील ४२ डझन हापूस आंबे जप्त करण्यात आले होते. आंबे नाशवंत माल असल्याने दंड भरून हा माल सोडा, अशी विनंती आंबे विक्रेते शफीक शेख यांनी केली होती. दंड भरून माल सोडविल्यानंतर त्यांच्या हातात प्रत्यक्ष ७ डझनच आंबे हातात पडले. मी नियमानुसार पूर्ण दंड भरलेला आहे त्यामुळे माझा संपूर्ण माल म्हणजे ४२ डझन आंबे मला मिळाले पाहिजे अथवा नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी फळ विक्रेते शेख यांनी केली.