
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
राजमाता लोकमाता, राष्ट्रमाता, समाजभूषण, कुलभूषण, कर्मयोगीनी, महातपस्विनी, रणरागिणी अशा अनेक बीरुदावलीचा संचय म्हणजे महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ में १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चोंडी या खेडेगावी मालकोजी शिंदे पाटील यांच्या परिवारात झाला. त्या नऊ वर्षांच्या असतानाच मल्हाररावांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाल अहिल्येने राजशिक्षणाचे व प्रशिक्षणाचे धडे आपले सासरे मल्हाराव होळकरांकडून घेतले. बालपणातच मल्हाररावांनी घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, राजकारणाचे व युद्धाचे डावपेच आखून लढाया करणे, स्वारी करणे, तह करणे, सूचक पत्रव्यवहार करणे, कर वसुली, न्यायदान आदींचे सूक्ष्म प्रशिक्षण बाल अहिल्येला दिले. लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे १७४५ ला अहिल्यादेवींना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव मालेराव, पुढे तीन वर्षांनी १७४८ ला मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या जन्मास आली. अहिल्याबाईं राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते. अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातील गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. सासरे मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं वेळोवेळी प्रशिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील राज्यकारभाराचा गुण पाहून मल्हारराव आत्मिक समाधानी होते.
महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या आयुष्याला लोककल्याणकारी कार्यासाठी अर्पण करताना परिसर व प्रदेशाची मर्यादा न पाहता संपूर्ण भारतात कार्य केले. देशभर बारवं (विहिरी), तलाव, कुंड, घाट व पूल बांधले आजच्या शासनाला अजूनही चांगल्या पद्धतीने जमत नाही ते अहिल्याबाईंनी सहजपणे दूरदृष्टीने केले. आपल्या राज्यातील उद्योगधंद्याला त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. भिल्ल, रामोशी अशा आदिवासी जमातींचे पुनर्वसन करून मानवताधर्म जोपासणाऱ्या व वाढवणाऱ्या एकमेव महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांचा उल्लेख गौरवाने करावाच लागतो.
लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच आयुष्य सुखा-समाधानाने व्यतीत होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. १७५४ ला अहिल्याबाई फक्त २१ वर्षांच्या असतानाच पती खंडेराव होळकरांना युद्धात वीरमरण आले. आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले. पण पुढे दुर्दैवाने १७६६ मध्ये सासरे मल्हारराव होळकरांचेही दुखःद निधन झाले. जवळची व्यक्ती अशी अकाली जाण्याने अपार दुःखी झालेल्या अहिल्यादेवी खचुन न जाता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी आपल्या नेतृत्वात चिरंजीव मालेराव होळकर यांच्यावर सोपवली. पण अवघ्या काही दिवसांमध्ये १७६७ मध्ये मालेरावांचा देखील मृत्यू झाला. अहिल्याबाईंवर दुःखाचे आभाळ कोसळले. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्शवतच आहे. म्हणूनच हिन्दुस्थानातील एक आदर्श राज्यकर्त्या म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
राजमाता अहिल्यादेवींनी आपली सात्विकता, स्वामीनिष्ठा, धाडस, पराक्रम, हिंदू धर्मावरील प्रेम, अध्यात्मिक बळ, भूतदया आणि जोपासलेला भाईचारा इत्यादिकांच्या जोरावर संपूर्ण स्वराज्याला, प्रसिद्ध पेशवाईला आणि गौरवास्पद मराठेशाहीला संपूर्ण जगभरात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. म्हणूनच “अहिल्याबाई म्हणजे मराठेशाहीत उमलुन फुललेले एक दिव्य फुल आहे” असे म्हटले जाते. आपल्या दिव्यत्वाच्या बळावरच २९ वर्ष राज्यकारभार नेटाने चालवणाऱ्या एक महान महाराणी म्हणून अहिल्यादेवी होळकर लौकिक पावल्या आहेत. सर्व प्राणीमात्रांना संजीवनरुपी अमरप्रेम आणि जीवन देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर मल्हाररावांचे स्वप्न पूर्णत्वास नेणाऱ्या एक महान पराक्रमी सुनबाई ठरल्या आहेत.
महाराणी अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्ध्या आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर होत्या. आपल्या २९ वर्षाच्या राज्यकारभारात अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व करून विजय हस्तगत केला होता. आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही हयगय करत नसत. म्हणूनच महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई सतत महिला सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करून विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिले व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिले. अहिल्याबाईंचे हृदय दया, क्षमा, निष्ठा, परोपकार या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जातं.
आपल्या स्वतःच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्या नंतरही अहिल्यादेवींनी धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणाऱ्या आपल्या मावळ प्रांताला पाहून त्यांनी स्वतः उत्तराधिकारी होण्याचा निर्णय घेतला. व ११ डिसेंबर १७६७ रोजी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. आपल्या अद्भुत शक्ती आणि पराक्रमाच्या बळावर प्रजेचा विश्वास संपादन करत इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा म्हणून महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी लौकिक प्राप्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व करून विजयही संपादन केले.
आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्यादेवी सतत तत्पर असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होणे, पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीणे त्या अगदी सहजगत्या करत असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण पसरलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लूट, अपहरण, हत्या इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली होती. पण यावर अंकुश निर्माण करून आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात चांगले यश प्राप्त झाले.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार हा समर्पित वृत्ती, अन्यायाची चीड, दुर्बलांचे रक्षण, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता व दुष्टांना शासन अशा तत्वावर आधारित होते. अहिल्यादेवींच्या ताब्यात माहेश्वर, चांदवड, आर्शीगढ, सेंधवा, गणबा, कुशालगड, हिंग्लजगड असे सात किल्ले होते. या सर्व किल्ल्यांवर संरक्षण व्यवस्था अतिशय चोख ठेवली होती. त्या जिवंत असेपर्यंत इंग्रजांना कुठेच शिरकाव करू दिला नाही. एवढी जरब त्यांच्या राज्यकारभारात होती, अशी आदर्श राज्यकर्ती धनगर महिला म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत. भारताच्या इतिहासातील स्वकर्तृत्वाने प्रज्वलित झालेले थोर व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.
मराठ्यांच्या इतिहासात होळकर संस्थांनचे महत्त्वाचे योगदान आहे. होळकर संस्थानातील मल्हाराव होळकर, तुकोजीराव होळकर, पहिले तुकोजीराव होळकर इत्यादी शूरवीर पराक्रमी धनगरांचा देदीप्यमान इतिहास आहे. मल्हारराव, यशवंतराव मुस्तदी पराक्रमी सरदार होते. त्यांनी मराठा साम्राज्यात अनेक लढायात यश संपादन केले. त्यामुळेच पेशवाईमध्ये होळकरांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले आणि मल्हाररावांचे शौर्ययुक्त साहस चिरंतन ठरले. हाच वारसा जपत मल्हाररावांच्या राज्याचा कारभार नंतरच्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी २९ वर्ष अतिशय नेटाने चालविला आहे व राज्यव्यवस्थेचा समाजव्यवस्थेचा आणि धर्मव्यवस्थेचा आदर्श पायाच घालून देण्याचे काम महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलं आहे. तत्कालीन समाजात आदर्श समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था व धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी राज्य इत्यादी आदर्श मूल्यांची रुजवणच महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. तरी पण आजच्या २१ व्या शतकातही महिलांना राजकारणात समान वाटा नाही व धनगर समाजाला इतका प्रचंड देदीप्यमान इतिहास आणि समृद्ध राजकीय वारसा असताना देखील राज्यकर्त्या धनगर समाजाची आज राजकीय अवस्था अत्यंत दुर्दैवी असल्याचे निदर्शनास येते आहे. धनगर समाज हा राजकारणापासून हजारो मैल दूर आहे, तो दूर फेकला गेला आहे. राजकारणाशी आपला काहीएक संबंध नाही, राजकारण हे आपले काम नाही अशी मानसिकता समाजाची बनलेली आहे. समाज आपला समृद्ध इतिहास विसरलेला आहे. तो स्वतःचे आत्मभान आणि आत्मसन्मान हरवून बसला आहे. त्यामुळे आपण राज्य करावे ही मानसिकताच मुळात या समाजात राहिलेली नाही. तो आता फक्त मतदानाचाच धनी राहिला आहे. त्यामुळे आधुनिक स्वातंत्र्योत्तर लोकशाहीत धनगर समाजाचे ‘राजकीय स्थान’ हे कालबाह्य झाले आहे की काय? हा यक्षप्रश्न एक अभ्यासक म्हणून माझ्यासमोर निर्माण होतो आहे. कारण संसदेमध्ये व विधिमंडळात धनगर समाजाचे नेतृत्व किती प्रमाणात आहे ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणून मला असे वाटते की, आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास अभ्यासण्याची व आपल्यातील आत्मभान आणि आत्मसन्मान उभं करण्याची गरज समाजाला आहे. एवढेच आजच्या जयंती च्या निमित्ताने केलेल्या या लेखप्रपंचातून सांगावेसे वाटते.
“महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!!!” 🙏👍
—✍️प्रा.डाॅ.गोविंद पाटील
वझरगा ता.देगलूर जि.नांदेड
मो.न. ९८६०९१३६३५
९५३७८१५९९४