दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
खेड :
खेड येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दुपारी येथील शासकीय विश्राम गृहावर संपन्न झाली. या बैठकीत महावितरण, रास्त धान्य दुकानें आणि मुक्त व्यापारविषयक ग्राहकांच्या तक्रारी वाढत असून याबाबत ग्राहक कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याविषयीं चर्चा करण्यात आली.अशा वेळी ग्राहकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
ही बैठक कोकण प्रांताचे श्री. अर्जुन देशमुख, श्री. श्रीकांत चाळके आणि श्रीमती अलका विंचू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तालुका अध्यक्ष लक्ष्मण आखाडे यांनी सर्व तालुका कार्यकारिणीचे स्वागत केले. या वेळी ग्राहक पंचायतीच्या वतीने नवे ऑनलाईन सदस्य संख्येत वाढ करण्याचे ठरवण्यात आले. विशेषतः महावितरण, रास्त धान्य दुकानें आणि इतर व्यापार विषयक ग्राहकांच्या तक्रारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने अशा तक्रारिंची गंभीर्यापूर्वक सोडवणूक करणे आणि आवश्यक अशा तक्रारीबाबत जिल्हा तक्रार निवारण मंचकडे दाद मागन्याविषयीं सर्वांनीच एकत्ररित्या काम करण्यावर सहमती दर्शवली. ग्राहक पंचायत कोणाच्या विरोधात नाही. मात्र ग्राहकांना अन्यायकारक वागणूक दिल्यास त्याविरोधात ग्राहक पंचायत नेहमीच ग्राहकांच्या बाजूने ठाम राहणार आहे.या व अशा महत्वाच्या विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत श्री. देशमुख आणि चाळके यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच 11 जून 2022 रोजी खेड तालुक्यातील ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला असून त्याची तयारी करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत तालुका अध्यक्ष लक्ष्मण आखाडे यांच्यासह उपाध्यक्ष विपीन शिंदे, कोषध्यक्ष सचिन मोरे, सहसचिव दिवाकर प्रभू, तालुका संघटक किशोर साळवी, सहकोशाध्यक्ष अजित तटकरे, सहसंघटक विजय येरुणकर, राजेंद्र दळवी, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीचा समारोप उपाध्यक्ष विपीन शिंदे यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.