दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे बँक खाते आहेत. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध प्रकारचे शेती अनुदान मिळत असते तसेच शेतकरी पेन्शन देखील मिळत असते. सदरील सर्व अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असते. ग्रामीण भागातील शेतकरी हा बहुतांश अल्पशिक्षित व निरक्षर असल्यामुळे बँक व्यवस्थापनातील मंडळी दलालांच्या मार्फत शेतकऱ्यांकडून काम तत्काळ करून देण्याच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूट करत असल्याचा प्रकार एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरून समोर आला आहे.
एकेकाळी कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेली जिल्ह्यातील एकमेव कुबेर बँक म्हणून ओळख असलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आजघडीला अंतर्गत मंडळी कडून बँकेचे दिवाळे काढल्याने बँक डबघाईस आली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारी, व्यापारी मंडळींची ठेव, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांचे खाते, पेन्शन धारकांच्या पगारी आदी पैशाची उलाढाल मध्यवर्ती बँकेतून होत. मात्र सद्यस्थितीस मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या अनुदाना पुरती उरलेली असल्याचे दिसून येत आहे. त्यात बँकेतील अधिकारी व दलाल मंडळींकडून शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या शासन अनुदानावर डोळा ठेवून शेतकऱ्याना लुबाडण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. तसेच ग्राहकांना नवीन पासबुक आणि एटीएम कार्ड देण्याचे सांगून प्रत्येक शेतकरी खातेदाराकडून एक हजार रुपयांची आकारणी केली जात आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पासबुक किंवा एटीएम कार्ड देण्यात आलेच नसल्याचेही समोर आले आहे. आणि विशेष म्हणजे सदरील एटीएम कार्ड हे थेट शेतकऱ्यांना न देता चक्क दलालांकडेच देण्यात आल्याचे समजते. परिणामी दलालांकडून असंख्य शेतकऱ्यांच्या नावावर आलेले शेती अनुदान हे परस्पर एटीएम द्वारे उचलुन घेण्यात आले आहेत. दलालाच्या हातात एटीएम देणाऱ्या बँक आधिकाऱ्याची व कर्मचाऱ्याची चौकशी करावी आशी मागणी शिवणी (जा) येथील शेतकरी मारोती
धोडींबा जामगे यांनी जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्याकडे केली आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तक्रारदार मारोती जमगे यांच्या नावे मद्यावर्ती बँक लोहा शाखेत खाते असुन माझ्या नावे शिवणी (जा) शिवारात १ हेक्टर ३० आर जमीन आहे. शासनाकडून मिळणारे विविध प्रकारचे अनुदान माझ्या नावे असलेल्या खात्यावर जमा झाले.
अनुदानाच्या यादीत ०५७५ हा क्रमांक असून अनुदानाची रक्कम ६ हजार ८०० रुपये होती. अनुदानाच्या यादीनुसार शिवणी येथील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू असताना अनुदान उचलण्यासाठी मी बँकेत गेलो आणि रितसर चलन भरून दिले असता खात्यात अनुदानाची रक्कम नाही. सदर रक्कम उचलुन घेतली असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. यासंदर्भात वरिष्ठ आधिकाऱ्याकडून अधिक माहिती घेतली असता तुमच्या नावे असलेल्या एटीएम अधारे ७ डिसेंबर २०२१ रोजी ४ हजार तर ३ जानेवारी २०२२ रोजी २ हजार रुपये अशी रक्कम उचलुन घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. परंतु मला अद्याप पर्यंत बँकेच्या वतीने एटीएम कार्ड दिलेच नाही तर मग माझ्या खात्यावरिल रक्कम एटीएम द्वारे कुणी उचलली.? असा प्रश्न उपस्थित केला असता बँक आधिकाऱ्यानी उडवा-उडविचे उत्तरे देऊन टाळण्यात आले.
सदरील सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वर कार्यवाही करण्यात यावी व मला न्याय द्यावा अशी मागणी शिवणी (जा) येथील शेतकरी मारोती जामगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे