दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर संतोष मंनधरणे
देगलूर:देगलूर : देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जनतेला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी बाजूच्या झेरॉक्स सेंटरचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झेरॉक्स सेंटर आहे का झेरॉक्स सेंटरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, असा सवाल शिवसेनेचे भागवत पाटील सोमुरकर यांनी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदनातून विचारला आहे
हणेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत किमान पन्नास हजार खातेदार आहेत. मात्र, त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याची ओरड होते. बँकेत खाते उघडण्यासाठीच्या फॉर्मपासून कृषी गंगा क्रेडिट कार्ड नुतनीकरण, सहीच्या नमुन्याचा फॉर्म यासह सर्वच कागदपत्रे बाजूच्या झेरॉक्स सेंटरवरून विकत घ्यावी लागतात. त्यामुळे बँकेला मुख्य कार्यालयातून कागदपत्रांच्या प्रति मिळत असताना बँक खातेदारांना खर्चात का टाकत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.एवढेच नाही तर हणेगावमध्ये मुुद्रांक विक्रीचा परवाना नसतानाही सदरील झेरॉक्स सेंटरवर अधिकचे पैसे घेउन मुद्रांक विक्री सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भागवत पाटील सोमुरकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊ न झेरॉक्स सेंटरवर कारवाई करावी अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.