दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.