दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करून नीरज चोप्रा याने इतिहास रचला होता. त्यानंतर ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करत आपलाच विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे.
नीरजने फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये हा विक्रम केला आहे. मात्र, नीरजला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
ऑलिम्पिकनंतर जवळपास दहा महिन्यानंतर नीरज चोप्रा फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये सहभागी झाला होता. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने ८६.९२ मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मीटर थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात ८५.८५ मीटर इतकाच थ्रो फेकता आला.
फिनलँडमधील स्पर्धेत २५ वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने ८९.८३ मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरज चोप्रा हा फिनलँडमधील या स्पर्धेत सहभागी झाला होता. जागतिक पातळीवर डायमंड लीगनंतरची ही प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते.