दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्यांना पोस्ट कोविड समस्या उद्भवल्या आहेत. त्यांच्या श्वसननलिकेत संसर्ग झाला असून दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोनिया गांधी यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत.
जयराम रमेश यांनी सांगितले की, 12 जून रोजी सोनिया गांधींच्या नाकातून रक्त येत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जयराम यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच श्वसनमार्गाच्या खालच्या बाजुला बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आलं आहे.
दरम्यान जयराम रमेश यांनी पुढं म्हटलं की, सोनिया गांधींवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना कोविडनंतर आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.