
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : तीन दिवस आधीच केरळात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला होता. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर काही दिवस मान्सूनचा खोळंबा झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूननं आगमन केलं.
अजूनही विदर्भातील काही भागात मान्सून दाखल झाला नाही. पण आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
हवामान खात्याने आज गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट (पिवळा इशारा) जारी केला आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. विदर्भातील गडचिरोली वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे. पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती राहणार असून आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.