
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधी पक्षात सध्या विचारविनिमय सुरु आहे. भाजपनं दोन नावावर शिक्कामोर्तब केले असल्याची सध्या चर्चा आहे
झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान याच्या नावाचा विचार सध्या भाजपकडून होत आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या समितीत याबाबत चर्चा होणार आहे. लवकरच भाजपकडून राष्ट्रपती निवडणुकीचा उमेदवार घोषित केला जाणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप प्रामुख्यानं आदिवासी समाजावर आपलं लक्ष केंद्रीत करीत आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भाजपनं आदिवासी समाजाच्या मताकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.
आतापर्यंत देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी व्यक्ती विराजमान झालेली नाही. त्यामुळे मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांचे नाव या पदासाठी जाहीर होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तर दुसरीकडे आरिफ मोहम्मद खान हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावण्यास योग्य ठरु शकतात, अशी भाजपमध्ये चर्चा आहे. ते राजीव गांधी आणि व्ही.पी. सिंग यांच्या कार्यकाळात मंत्री होते.
एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह चर्चा करत आहेत.राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा काल फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे.