
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- अनिल पाटणकर
ता.वेल्हे, पुणे:- तालुक्यातील दुर्गम भागातील सोंडे माथना येथील राजे शिवछत्रपती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी ऋषिकेश किन्हाळे याने आपली जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यावर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेत कोणत्याही वेगळ्या शिकवणीशिवाय तब्बल ९६.४० गुण मिळवून वेल्हे तालुक्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे
ऋषिकेशचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी आणि शेतमजूर त्यामुळे ऋषिकेशच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक त्यातच दोन मोठ्या बहिणी आणि त्यांचं उच्चशिक्षण असे असतानाही ऋषिकेशच्या आई वडिलांनी परिस्थितीचे कारण कधीही पुढे केले नाही याउलट सर्वच मुलांना काबाडकष्ट करून का होईना पण शिकावायचे, मोठे करायचे, आपल्या सारखे दारिद्र्य त्यांना येऊ नये यासारखी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून मुलांकडूनही आई वडिलांना तेवढीच साथ मिळत असल्याचे ऋषिकेशच्या यशाने आज सर्वांना दाखवून दिल आहे.
ऋषिकेश ज्या शाळेत शिकतो त्या गुंजवणी शिक्षण संस्थेचे,राजे शिवछत्रपती विद्यालय, सोंडे माथना या विद्यालयाने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यातच ऋषिकेशच्या अभूतपूर्व यशाने शाळेच्या यशामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी बोलताना ऋषिकेशने सांगितले कि, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मला अभ्यासासोबतच आईला शेतात आणि घरात मदत करावी लागत होती मात्र असे असतानाही मी रोज कमीतकमी आठ तास अभ्यास करीत होतो त्यासोबतच मला अभ्यासामध्ये वर्गशिक्षक भाऊसाहेब रासकर सर, मुख्याध्यापक वाल्हेकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, फार मेहनत घेतली, आजारी असताना धीर दिला, मन विचलित होऊ दिले नाही, सतत मदतीचा हात दिला म्हणून मला हे यश संपादन करता आले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रमदादा खुटवड व संस्थेच्या सचिव तृप्तीताई खुटवड तसेच मुख्याध्यापक,सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी यांचे अभिनंदन केले.