
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
शिऊर : वारकरी संप्रदायाचे शिखरस्थान असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी श्री क्षेत्र शिऊर येथे होणार असून हा सप्ताह व्यापक स्वरूपात करण्यासाठी तण, मन, धनाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी केले.
दिनांक ०२ ते ०९ ऑगस्ट दरम्यान शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिराच्या आवारात
भव्य दिव्य स्वरूपात होणार असून सप्ताहाच्या पूर्वनियोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथराव जाधव बोलत होते.
श्री संत शंकरस्वामी महाराजांचा आधिकार मोठा असून त्या तुलनेत त्यांची ख्याती पोहचली नसल्याची खंत व्यक्त करत अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून स्वामींचा महिमा राज्यभर पोहचेल अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जास्त समुदाय जमवता आला नव्हता यंदा मात्र या सप्ताहाच्या सांगतेला एक लाख भाविकांची उपस्थिती असेल , या सर्व भाविकांना बसण्यासाठी व महाप्रसाद वितरणासाठी नियोजन करण्यात येत आहे, १०० पोते साखरेच्या माध्यमातून महाप्रसाद तयार करण्यात येणार आहे शिवाय आठही दिवस अन्नदान सुरू असणार आहे,
सप्ताह समितीसह विश्वस्त मंडळाने जवळपास ११० गावांना भेटी देऊन सप्ताहाचे निमंत्रण दिले आहे, शिवाय त्या गावातून मोठ्या स्वरूपात मदत देखील मिळणार असल्यासाचे एकनाथराव जाधव म्हणाले.
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थानचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश झाला असून जवळपास दोन कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव आहे, या निधीच्या माध्यमातून भक्तनिवास, प्रणिता तीर्थ विकास, व रस्ते काम हाती घेण्यात येणार आहे.
लोकसहभागातून जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येऊन भव्य समाधी मंदिर नव्याने बांधण्यात आले असून या समाधीस्थळी सप्ताह होत असल्याने आधिक महत्व असल्याचे जाधव यांनी पत्र परिषदेत नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, सुभाषचंद्र जाधव, रामभाऊ महाराज मगर, मधुकर पवार, शिवाजी साळुंके, कचरू जाधव, प्रभाकर आढाव, दीपक गाजरे आदींसह सप्ताह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.