
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
दि.१९.१९९५ साली आमच्या सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार होते नितीन शिंदे.सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार.त्यावेळी जिल्ह्यात पाच ठिकाणी अपक्ष आमदार निवडून आलेले.आर आर आबा पाटील आणि जयंत पाटील हे दोन काँग्रेस आमदार इतर सर्व अपक्ष आमदार.
निवडून आलेले अपक्ष आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसमधीलच पण काँग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष लढले आणि विजयी झाले. राज्यात काँग्रेसचे बऱ्यापैकी पानिपत झाले होते आणि शिवसेना भाजप युती सत्तेच्या जवळपास होती,त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही आमदार कमी पडत होते.मग सांगली जिल्ह्यातील भिलवडी वांगी मतदारसंघात विजयी झालेल्या संपतराव व्यंकटराव देशमुख या तरुण तडफदार आमदारांनी युतीसोबत अपक्ष आमदारांच्या वतीने बोलणी केली.यावेळी दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच अपक्ष आमदारांनी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारला पाठिंबा दिला होता. यावेळी संपतरावांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती मात्र त्यांनी आमच्या भागातील पाणी योजनांना निधी द्या.मंत्रीपद नको’अशी भूमिका घेतली. काही दिवसांनी दक्षिण महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांचा प्रतिनिधी म्हणून शिराळा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारले.
हा सगळा इतिहास आठवतोय. मी चौथी पाचवीला शिकणारा विद्यार्थी. गावात वर्तमानपत्र यायची.अग्रदूत आणि पुढारी.त्यातील सगळ्या बातम्या रोज सकाळी वाचून काढायच्या.तेव्हा कव्हरेज बर असायचं.या बातम्या वाचत असताना शिवसेना या पक्षाबद्दल एक आपुलकी निर्माण व्हावी असे निर्णय घडत होते.
एक रुपयात झुणका भाकर पेपरला छापून यायच.आमच्या शेजारी बबन अण्णा माने यांची पानपट्टी होती.त्यांचा बँडचाही व्यवसाय. त्यांच्या पानपट्टीवर पेपर यायचा.एक रुपयाला झुणका भाकरी असलं का?अशा चर्चा .कारण चहा तीन रुपयाला आणि भजी प्लेट पाच रुपयाला होती. पण एक दिवस विट्याच्या स्टँडवर सुरू असलेली झुणका भाकर रुपया देऊन खाल्ली आणि बबन अण्णाला येऊन सांगितल.
शिवसेनेची क्रेझ अगदी शाळकरी मुलांच्यातही होती.भगव्या रंगाचा नाम कपाळावर लावून शाळेत जाणे,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पेन मिळत होते,तेही घ्यावेसे वाटत.आमचा भाग शेतकरी कामगार पक्षाचा.त्यांचे आणि शिवसेनेचे छत्तीसचा आकडा.पण शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव ओसरत आलेला. गावोगावी फक्त नेते राहिलेले. कार्यकर्ते विखुरलेल्या अवस्थेत होते.क्रांतीअग्रणी जी डी बापू यांच्यासारखा स्वातंत्र्ययोद्धे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य पातळीवर नेतृत्व करत होते.त्यांनीच संपतराव अण्णा देशमुख यांना आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
म्हाताऱ्या लोकांना एसटीने प्रवास करताना अर्धी तिकीट ही सवलत शिवसेना भाजप युतीने जाहीर केली तेव्हा हे खरंच आहे का हे बघायला सुद्धा लोकांनी एसटीने प्रवास केला होता..
तेव्हाचे दिवस खूप वेगळे होते.संपतराव देशमुख असतील किंवा पतंगराव कदम असतील यांच्यासारख्या नेत्यांना बघितलं तरी लोकांना आनंद व्हायचा. सभा कोणत्याही पक्षाची असो सगळे लोक ऐकत.आज राजकारण खूपच खाली गेलं आहे. शिवसेनेचा हा वाघ आणि भगवा पहिला की तत्कालीन शिवसेना सरकारच्या अनेक आठवणी ताज्या होतात.अल्लड वयातील आपले राजकीय आकलन आज आठवले तरी हसू येते..
संपत लक्ष्मण मोरे