
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी उद्या २० जूनला मुंबईत निवडणूक होत असून भाजपसह महाविकास आघाडीमध्ये रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी आमदारांची हॉटेलवारी केली आहे.
आज मुंबईत झालेल्या शिवनेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना कानमंत्र दिल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातूनही आमदारांना सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, भाजपच्या आमदारांची बैठक ताज हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
भाजपच्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर खलबतं झाली. देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आमदारांनी मतदान करताना काळजी घ्यावी. कसलीही चुक होता कामा नये. उद्याच्या निवडणुकीचा विजय आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा ठरेल. कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे ही मला माहिती आहे. काहीही गोंधळ होणार नाही याचा मला विश्वास आहे.त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी. संजय कुठे, आशिष शेलार,गिरीष महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या बैठकीत काय झालं?
भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. ‘निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही’, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिला.
‘मतदान करताना कुठल्याही चुका करू नका. निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही एक एक महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही सामना आपण जिंकणार आहोत’, असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीवेळी केलेल्या अचूक कामगिरीचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.