
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी” वर्षात येत असल्याने, भारत सरकारने “ब्रँड इंडिया ॲट ग्लोबल स्टेज” यावर लक्ष केंद्रित करून देशभरातील 75 राष्ट्रीय-स्तरावरच्या प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची योजना आखली असून अशा प्रतिष्ठित ठिकाणांवर योग प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह हे 21 जून 2022 रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार या पवित्र शहरात वसलेल्या हर की पौडी येथे 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.
तसेच केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील जगप्रसिद्ध निसर्गरम्य दाल सरोवराच्या काठावरील शेर- ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्या सोबत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, हे सुद्धा या सोहळ्यात सामील होतील.
प्रतिष्ठित मान्यवरांव्यतिरिक्त, श्रीनगर येथील कार्यक्रमात पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील असेल.
पंतप्रधानांच्या नेतृत्वात अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मैसूर पॅलेस ग्राउंड,कर्नाटक येथे प्रमुख सोहोळ्यात होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि या समारंभात होणाऱ्या योग प्रात्यक्षिकांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
पंचायती राज मंत्रालयाने दिनांक 24 मे 2022 च्या निर्देशाद्वारे विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पंचायती राज विभागांना 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशभरातील पंचायती राज संस्था/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सज्ज रहाण्याचे आवाहन करण्याची विनंती केली आहे. आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन ग्रामीण भारतात साजरा करण्यासाठी पंचायती राज संस्थांना ग्रामीण भारतात योगाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी योगतज्ञांच्याद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम/प्रात्यक्षिके /परीषदा आयोजित करत कार्यालयात किंवा पंचायत भवनात प्रशिक्षण उपक्रम/प्रात्यक्षिके/भाषणे असे उपक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंचायत राज मंत्रालयाने पंतप्रधानांकडून दिनांक 6 जून 2022 रोजी आलेले पत्र देखील सर्व सरपंचांना पाठवले आहे ज्याद्वारे ग्रामपंचायतींना आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन, विशेष दिवस बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि 21 जून, 2022 रोजी होणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकांमध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, योगाभ्यासाठी आणि सामूहिक योग प्रात्यक्षिकांसाठी सरपंचांना त्या त्या विभागातील प्राचीन ठिकाणी किंवा पर्यटन स्थळावर अथवा पाणवठ्याजवळील जागा निवडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.