
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर;इयत्ता पहिली ते दहावी (सेमी इंग्रजी) पर्यंतच्या मराठी शाळेत प्रवेश देण्यासाठी खासगी शाळांनी अक्षरश: लूट चालू केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर तर कुणाचाच अंकुश नसल्याने पालकांना कर्जबाजारी होवून पाल्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देण्याची वेळ आली आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी ५ वर्षापासून डोळे असून आंधळे असल्यासारखे वागत असल्याने पालकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात खाजगी संस्थेअंतर्गत अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी पालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्याचाच भाग म्हणून मराठी शाळेत मुलांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र त्याची खंत ना संस्थेला आहे ना मुख्याध्यापकांना आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी अनेक शिक्षक (सरप्लस) च्या वाटेवर आहेत. मात्र त्याचे सोयरसुतक संस्थाचालकांना राहिले नाही. मराठी माध्यमाच्या शाळेत (सेमीत) प्रवेश देण्यासाठी ३ हजार ते ८ हजार रुपयापर्यंत मुख्याध्यापक व त्यांच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्रास पैसे घेत आहेत. जे पालक पैसे देत नाहीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत परीक्षा घेतली जाते व त्यांना नापास केल्या जाते. जे पैसे देतात त्यांच्या
पाल्यांना विनाअट प्रवेश दिला जातो. आरटीई कायद्यान्वये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेता येत नाही. मात्र पैसे घेण्यासाठी मराठी माध्यमाच्या (सेमी) शाळा कोणत्याही थराला जात असल्याचे दिसून येत आहे.
अनेक पालकांच्या तक्रारी
आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या (सेमी) शाळेत प्रवेश देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे अशा तक्रारी अनेक पालकांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र याबाबत शाळेच्या विरोधात कुणीही ठोस पावले उचलायला तयार नाहीत.
प्रभारी गटशिणाधिकारी गांधारीच्या भूमिकेत ३१ मे २०१७ रोजी बालाजी सक्कीनवार हे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले तेव्हापासून कायमस्वरूपी गटशिणाधिकारी नाहीत. जून २०१७ पासून अन्य व २०१८ पासून शालेय पोषण आहार अधीक्षक राजकुमार जाधवर प्रभारी गटशिणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी
शाळेकडून लूट केली जात आहे याची जाणीव असताना व अनेक पालकांनी लेखी / तोंडी तक्रारी करूनही ते काहीही करत नाहीत. डोळे असून ते आंधळे असल्यासारखे वागत असल्याने मराठी (सेमी) माध्यमांच्या शाळांनी आपल्या मनाला येईल तसे पालकांकडून हजारो रुपये प्रवेश देण्यासाठी उकळत आहेत.
देगलूर तालुक्यातील रहिवासी व सेवनिवृत्त शिक्षक माधवराव मिसाळे गुरुजी यांच्याकडे ३ वर्षे जि.प. शिक्षण सभापतीचा पदभार होता, मात्र त्यांनाही वाटले नाही की, आपल्या तालुक्यात पूर्णवेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक करावी म्हणून लोकप्रतिनिधींना देणे घेणे नाही, सर्वच पक्षाचे पदाधिकारी नामधारी त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मर्जीवरच या तालुक्यातील कारभार चालत असल्याने शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र सुद्धा भ्रष्टाचारात गळ्यापर्यंत बुडाले आहे.
शाळेवरून धडा घेतील का ? बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सिध्देश्वर
विद्यालयात मंगळवारी (१४ जून रोजी) २२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी ०१ लाख ७६ हजार रुपये डोनेशन घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापक, २
शिक्षक व एका संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तेथील आमदारांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्टिंग ऑपरेशन केले होते. शहरातील मराठी माध्यमाच्या शाळा माजलगाव येथील शाळेत घडलेला प्रकार लक्षात घेणार आहेत की आपल्याला कोण काय करते या मग्ररीत वावरणार आहेत.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर लूटीचे केन्द्र शहरासह ग्रामीण भागात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला तरच आपल्या पाल्याचे भवितव्य आहे हो खोटा समज पालकांचा झाला आहे. नर्सरी, एलकेजी व युकेजी पासून पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी हजारो रुपये प्रवेश देण्यासाठी डोनेशन व दरवर्षी हजारो रुपये फीस आकारली जाते. शासनाने जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रवेशासाठी डोनेशन किती घ्यावे व फीस किती घ्यावी याबाबत आदेश काढले असले तरी त्या आदेशाचे कसलेच प्रकारे पालन होताना दिसत नाहीत. जी शाळा नामांकित आहे त्या शाळेची फीस व डोनेशन बघून पालकांचे पाय थरथर कापतात व ते कर्जबाजारी होत आहेत. मात्र खोटया प्रतिष्टेपोटी पालक काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात आपली मनमानी चालवली आहे.