
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. भविष्यातील वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक रुग्णालयात आंतररुग्ण म्हणून भरती होणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डिस्ट्रीक्ट टास्क फोर्सच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, निवासी उप जिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, संगीता सानप, श्रीमती चव्हाण, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शल्य चिकीत्सक डॉ. मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस तसेच फ्रंट लाईन वर्कर यांनी प्रिकॉशन डोस लवकरात लवकर घ्यावा. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी लसीकरण केले आहे का नाही याची खातरजमा करावी. शहरातील मेल्ट्रॉन रुग्णालय हे कोविड केअर सेंटर (CCC) म्हणून उपयोगात आणले जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे म्हणाले की, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात लसीकरण कमी आहे तेथील लोकप्रतिनिधींची मदत घेऊन लसीकरण पूर्ण करावे तसेच ज्या ग्रामपंचायतींनी 100 टक्के लसीकरण केलेले आहे त्या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात यावे असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. पारस मंडलेचा यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती तसेच लसीकरणाची माहिती दिली . डॉ. शेळके यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.