
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री,रमेश राठोड
आर्णी :- राष्ट्रीयीकृत बँकमध्ये सामान्य नागरिकांना कर्ज घेण्याकरिता त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तळागाळातील लोक बँकेच्या प्रवाहातून दुरावला गेला आहे. प्रवाहातून दूर गेलेल्या नागरिकांना कागदपत्रांचा तगादा न लावता त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून त्यांचा उद्धार केला तरच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन वणी-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळासाहेब धानोरकर यांनी जिजाऊ अर्बन आर्णी शाखेच्या उदघाटना प्रसंगी केले.
आर्णी तालुक्याची बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल बघून विविध बँक व सोसायटीचा कल तालुक्याकडे वळला आहे. माजी आमदार प्रकाश देवसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली जिजाऊ अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या आर्णी शाखेचे लोकार्पण माहूर चौक येथे पार पडले. लोकार्पण सोहळ्याचे उदघाटक वणी-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळासाहेब धानोरकर यांनी तळागाळातील नागरिकांची राष्ट्रीयीकृत बँक व इतर बँके मध्ये होणारी फरफट याकडे सगळयांचे लक्ष वेधले. सामान्य नागरिक इतर बँकेत सहज कर्ज उपलब्ध होत नसल्याने ते बँकेच्या प्रवाहापासून दूर चालले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जर या सामान्य नागरिकांना जिजाऊ अर्बनने सहज कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक समस्या निकाली काढल्या तरच या शाखेचा विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन धानोरकर यांनी लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेवर सुद्धा ताशेरे ओढले. देशातील जवान हा चार वर्षांनी निवृत्त होणार मात्र वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा मोदींना तिसरी वेळ प्रधानमंत्री बनायचे डोहाळे लागले असल्याचा टोला त्यांनी लगावला. जिजाऊ अर्बन आर्णी शाखेच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री शिवाजीराव मोघे, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार विजय खडसे, तातुजी देशमुख, टीकाराम कोंगारे, जितेंद्र मोघे, बाळासाहेब मुनगिनवार, साजिद बेग, राजू तोडसाम, अनिल आडे, सुनील भारती, प्रदीप वानखडे, रवी नालमवार नितेश बुटले उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक प्रकाश देवसरकर यांनी केले तर आभार संतोष जैन यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मयुरी देवसरकर, प्रकाश नरवाडे, शेख ख्वाजा, सिंधुताई वानखडे, सुरेश कदम, महादेव खंदारे, सविता कदम यांनी परिश्रम घेतले