
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भोगाभोगाचे योग सरत आले की योगायोगाचे योग सुरु होतात असे अनुभवाने काळ्याचे पांढरे झालेले बरेच केसवाले म्हणतात. मलाही आता सत्तरीमुळे असंच काहीसं वाटायला लागलंय बरं का ! नशिबात जुळून येणारे योग सध्या दुर्मिळ झालेत म्हणुन कधी कधी कावळा बसायला अन फांदी मोडायला असे एकत्र येणारे योग वाट्याला येतात. ठरवलेला बेत फिसकटणे हा ही योगच, तोही अनुभवतो कधी कधी. विवाह बंधनाचा योग रेशिमगाठी जुळल्या तरच येतो याचा दांडगा अनुभव लग्न जुळविणेचा प्रयत्न करतो तेव्हा मला येतोच येतो. आडगावातल्या मुलांची लग्न जमवताना हा योग प्रकर्षाने आडवा येतोय व तो उभा करणारा एखादा बाबा रामदेव सारखा योगी सापडतोय काय हा प्रयत्न मागील वर्षभर तरी मी करतोय. ध्यानी मनी नसताना असा योग जुळून येईल यावर मात्र मी श्रद्धा बाळगून आहे, असेल कदाचित हा आंधळा विश्वास पण योग काय थोडाच सांगून येतो ?
या सगळ्या धावपळीत आता सत्तरी गाठता गाठता गात्रं थकू लागली आहेत, हालचालींना हवी तशी साथ शरीर देत नाही मग बाकीचे सर्व रस्ते सोडून योगाच्या योग्य रस्त्यावर पाऊल वाकडे टाकून वाटचाल करावी असं सतत मागील दोन तीन वर्ष वाटत आहे. काही आरंभवीर ठरवून योग सुरु करुयात म्हणून योगादिनी पहाटे पहाटे उठून मुखमार्जन करून, आसन मांडून, योगातील आसने करायला सुरवात करतात अन पहिल्याच दिवशी अंग मोडून दहा बारा अवघड योगासने करतात. काय होणार ? योगासने केल्यामुळे सैलावलेले शरीर सायंकाळपर्यंत घट्ट होऊ लागते, हात पाय सांधे प्रचंड दुखायला लागतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उठायलाच जमत नाही अन योगायोगाने फक्त योग दिनीच योग होतो. आपल्याकडेच असं होत असं नाही सगळीकडे असंच होतं असं म्हणतात. मी तरी कुठे इतर देशात काय होतय हे पहायला गेलोय ! आपला देश बरा न आपण बरे. हो आपले प्रधानमंत्री मात्र सगळ्यांनी योगा करावा असे प्रामाणिक आवाहन करत असतात. तर मी काय म्हणत होतो, आंतरराष्ट्रीय योग दिन तरी योगा करून साजरा करावा, तेवढीच दुधात साखर पडल्याचा योग येतो अन त्यातच समाधान मानायचं. येईलच पुन्हां पुढच्या वर्षी योगा दिन तेंव्हा नक्की योगा सुरु करुयात असं मनोमन ठरवायचं, अंगच दुखतय त्याला काय करणार ?
राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, लययोग, भक्तियोग असे बरेच योग आहेत असं म्हणतात अन म्हणे त्यात यम – नियम, ध्यान – धारणा, आसन, प्राणायाम, पतंजली योग अशी म्हणे अंगही असतात. बापरे बापरे असं काही आठवलं की अंगच अवघडून जातं बघा, तेच मुळी एल्गार पुकारतं. संप की काय म्हणतात ना तसं मन संपावर जातं, मग काय ? मग काय पुन्हां योगायोगानं हे योगाचं असलं काही नकोच असं वाटायला लागत त्यापेक्षा आपण सक्काळी सक्काळी चालायला जावं, मस्त समुद्राची खारी हवा खारी – बिस्किटे खाल्यासारखी खावी – प्यावी असं मनांत येतं. घडत मात्र काहीच नाही, डायनिंग टेबलवर मस्त वाफाळलेला चहा अन सोबत क्वालिटीची खारी खाण्यातच आनंद मानायचा ! माझं हे असं होतं, तुम्ही काय करता बरं ?
पण खरं सांगू का? उभी आसने, बैठी आसने, पाठीवर झोपून, पोटावर झोपून, खाली डोके वर पाय, कधी कधी खाली पाय वर डोके, शीर्षासन, पद्मासन, सिद्धासन, मयुरासन, शशकासन, मत्स्यासन, मण्डुकासन, धनुरासन, उत्तान पादासन, कन्धारासन, त्रिकोणासन, सुप्त वज्रासन अशी त्रिकोणी, चौकोनी, वर्तुळाकार, अर्ध गोलाकार, लंब वर्तुळाकार आसनं करण्यापेक्षा मला शवासन करायला आवडतं अन मला अगदी ते सहजच जमतं बरं का !
अन हो, हे सर्व आजच आठवायचं काय कारण असावं बर? आज आंतरराष्ट्रीय योगा दिन नाही का !!! तेच तर औचित्य !!!
®️ सुनील चिटणीस
२१ जून २०२२
मं ग ळ वा र