
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नागपूर : कृषी संशोधनासाठी आयसीएआरच्या धर्तीवर पशुवैद्यकीय संशोधनासाठी इंडियन कौन्सिल ऑफ व्हेटरनरी रिसर्च-आयसीव्हीआर बनायला जास्त वेळ लागणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग, दुग्ध संवर्धन विभाग हे स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत झाले आहेत यामुळे पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसायातील तंत्रज्ञान , पायाभूत सुविधाचा विकास यावर विशेष भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन, मस्त्यविज्ञान तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी आज नागपूरात केले. नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ – माफ्सूच्या अधीन सेमीनरी हिल्स येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे 20 वा दीक्षांत सोहळा तसेच नॅशनल एकेडमी ऑफ वेटरनरी सायन्सेस – एनएवीएसच्या दोन दिवसीय वैज्ञानिक परिषदचे आज आयोजन करण्यात आले होते .या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचे हस्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ .मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी एनएवीएसचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राव, माफ्सूचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
वैज्ञानिकांनी विकसित केलेले कृत्रिम गर्भारोपण-आयव्हीएफसारखे तंत्रज्ञान पशुपालकांकडे पोहचावे सोबतच असे तंत्रज्ञान व्यावसायिकरित्या खाजगी गुंतवणूकीसाठी उपलब्ध व्हावे ,यासाठी या दोन दिवसीय परिषदेत विचारमंथन व्हावे, असे आवाहन रुपाला यांनी यावेळी केले. प्राकृतिक शेतीसाठी , मातीतील कार्बन फिक्सेशनसाठी गायीचे शेण महत्वाचे आहे. गोधनाच्या नैसर्गिक मृत्युनंतर त्यांच्या देहाच्या विल्हेवाटीचे प्रमाणिकरण , त्यापासून नैसर्गिक खतनिर्मिती अशा प्रक्रियावरही या परिषदेत चर्चा व्हावी , अशी अपेक्षा त्यांनी केली.
भारत देशात परंपरागत कृषी विद्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. पाश्चात्य देशातील कृषी विज्ञान शिरकाव करण्या अगोदर आपली शेती आणि पशु शाळा ह्या प्रयोग शाळा तर आपले शेतकरी हे वैज्ञानिक होते .त्यांचे हे कालसुसंगत ज्ञान परीक्षण न करताच, त्या ज्ञानाला अवैज्ञानिक म्हणणे चुकीचे आहे. कृषी संशोधनाला भारत केंद्रित बनवून स्थानिक आवश्यकतेनुसार पूर्तता करणे यावर भर असावा. पशुवैद्यकीय विज्ञान शेतक-यांपर्यंत सहजरित्या पोहचण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती प्रमाणे स्थानिक भाषेत सुद्धा उपलब्ध व्हावं असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ . मोहन भागवत यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी माफ्सूचे कुलगुरू डॉ. प्रवीण पातुरकर यांनी विद्यापीठाव्दारे करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . कळमेश्वरच्या दुधबर्डी येथील कृषी विज्ञान केंद्राची स्थापना, आयसीएमआर पुरस्कृत ‘वन हेल्थ सेंटर’ ला मंजूरी, कोवीड चाचणी प्रयोगशाळेतून 25 हजार नमुन्यांची तपासणी या उपक्रमांचा त्यांनी यावेळी विशेषत्वाने उल्लेख केला.
याप्रसंगी डॉ. मोहन भागवत , पुरुषोत्तम रुपाला आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांना नॅशनल एकेडमी ऑफ वेटरनरी सायन्सेस एनएवीएसद्वारे मानद फेलोशिप प्रदान करण्यात आली. 20 प्रख्यात पशुवैद्यकांनाही यांना यावेळी पशुवैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी एनवीएस फेलोशिप मान्यवरांच्या हस्ते मिळाली. या परिषदेनिमित्त एका सारांश पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
या दोन दिवसीय परिषदेत देशभरातून पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले.