
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे गोव्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील कार्यक्रमात 100 टक्के विद्युतीकरण झालेल्या रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूर (कर्नाटक) या कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. ‘मिशन 100% विद्युतीकरण – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी, मडगाव आणि उड्डपी येथील इलेक्ट्रिक लोको ट्रेनला पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹1287 कोटी आहे.
केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मडगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, कोकण रेल्वे विद्युतीकरणामुळे गोव्याचा शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत होईल, तसेच पर्यावरण रक्षणासाठी मदत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमात, बयप्पनहल्ली येथील वातानुकूलीत रेल्वे स्थानक सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. सुमारे 315 कोटी रुपये खर्चून आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर हे रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पाच टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. ठोकूर-बिजूर, बिजूर-कारवार-कारवार-थिवी, थिवी-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा. यातील शेवटचा टप्पा रत्नागिरी-थिवीचे विद्युतीकरण 28.03.2022 रोजी पूर्ण झाले. सर्व लोको पायटलना टप्प्याटप्याने इलेक्ट्रीक वाहतूकीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोकण रेल्वेचे आता 100% विद्युतीकरण झाले आहे. यामुळे उच्च परिचालन कार्यक्षमता आणि वाहतुकीसाठी कमी खर्च होईल, याचा देशाला तसेच कोकण रेल्वे महामंडळाला फायदा होईल. विद्युतीकरणामुळे वार्षिक 150 कोटी रुपये इंधनावरील बचत होईल. तसेच वाहतूकखर्चात 18% नी कपात होईल.
कोकण रेल्वे मार्गावर एकूण 91 बोगदे आहेत, ज्याची एकूण लांबी 84.496 किमी (एकूण मार्गाच्या 11%) आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण मार्ग-740 किमी
महाराष्ट्र- 382 किमी, गोवा-106 किमी आणि कर्नाटक- 252 किमी
रेल्वेमार्ग लांबी- महाराष्ट्र- 970 किमी, गोवा- 163 किमी, कर्नाटक: 294 किमी
विद्युतीकरणासाठीचा एकूण खर्च: 1,287 कोटी रुपये