
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : विधान परिषदेच्या निडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार फुटल्याची बातमी समोर आली.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावरून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आळंदी येथे पत्रकारांशी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. तर शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मी आलो आहे, असंही बिचुकले म्हणाले आहेत.
इथे सर्वसामान्यचे रोजचे प्रश्न आहेत. त्यात लोकांना जगणं मुश्किल झालं आहे आणि अशा परिस्थितीत जर एकनाथ शिंदेंना राजकारण सुचत असेल तर काय म्हणावं. जरी माझा संबंध शिवसेनेसोबत नसला तरी सांगतो आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. हे बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत यामध्ये काही दुमत नाही, असा घणाघात अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे सुरत येथील ले मेरेडियन हॉटेल येथे थांबले आहेत. तर बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच ट्विट करत प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. त्यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.