
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : करोना संकटाची वर्षें सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला… श्रीक्षेत्र आळंदी येथून मंगळवारी (२१ जून) संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आषाढीच्या अलौकिक सोहळ्यासाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. उत्साहाने भारलेले वारकऱ्यांनी देहभान हरपून ‘माउली, माऊली…’ चा अखंड अखंड घोष करीत चैतन्य भरले आणि भक्तीकल्लोळाला जणू उधाणच आले…
गेल्या काही दिवसांपासूनच राज्याच्या विविध भागातील लाखो वारकऱ्यांची पावले आळंदीकडे येत होती. त्यामुळे आळंदीत भक्तीचे अनोखे चैतन्य साकारले होते. पालखीच्या प्रस्थानाचा दिवस उजाडताच अगदी पहाटेपासूनच इंद्रायणीच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला. पंचक्रोशीत हरिनामाचे सूर निघू लागले. माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यामुळे मंदिरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले.
पांढरे शुभ्र वस्त्र, डोहीवर टोपी आणि खांद्यावर भागवत धर्माचा पताका घेऊन टाळ-मृदंगाचा अखंड गजर वारकऱ्यांकडून सुरू झाला. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्यांचा मंदिरात प्रवेश सुरू होताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. हरिभक्तीचे विविध खेळ रंगवीत वारकर्यांनी सोहळ्यात रंग भरले. अगदी देहभान हरपून वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ठेका धरला. हा सोहळा पहाण्यासाठी आळंदीत माऊली भक्तांची गर्दी झाली होती.
आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास माउलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्या वतीने आरती करण्यात आली. आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख मानकऱ्यांचा नारळ प्रसाद आणि परंपरेनुसार पागोटे देण्यात आले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्यासह इतर विश्वस्थ, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर तसेच प्रमुख चोपदार आदी मंडळी त्यावेळेस उपस्थित होती. वीणा मंडपात आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि विना मंडपातून पालखी बाहेर येताच दिंड्यांनी एकच जल्लोष केला. ‘माऊली, माऊली’ च्या जयघोषात पालखीने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.