
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
दि:२२.पंढरपूरचा विठोबा कोणाला पावणार हा सध्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही पडलेला प्रश्न आहे. राज्याच्या राजकारणात जो काही खेळखंडोबा सुरू आहे तो पाहिल्यावर, राजकारण हे सुसंस्कृत माणसांनी जाण्याचे क्षेत्र नाही यावरचा विश्वास अजून घट्ट बसतो. राजकारण ही खरं तर गंभीर व जबाबदारीची गोष्ट आहे. जनतेच्या कल्याणाचा विचार यात सर्वप्रथम व सर्वतोपरी असावा असे अपेक्षित आहे. पण कुठेच हे घडत नाही. आपल्या देशातील राजकारणही त्याला अपवादी नाही आणि राज्यातलेही. बंड ही काही पक्षांना नवीन गोष्ट नाही. त्याची दीर्घ परंपरा आहे आपल्या पक्षांना.
पूर्वी पक्ष मोठा होता आणि नेते पक्षाध्यक्षाच्या आदेशात राहायचे. नंतर नेते मोठे झाले आणि पक्ष लहान होत गेला.कार्यकर्तेही पक्षापेक्षा आपापल्या नेत्यांच्या मागे उभे राहिले. कारण स्वार्थ. जो कोणालाच सूटत नाही. त्यामुळेच नंतर प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं कारण स्थानिक नेते बलवान होऊ लागले. पक्षनिष्ठाच जिथे नाही तिथे जनतानिष्ठा कोठून असणार? पण हे सर्व जनतेच्या कल्याणासाठीच चालू आहे असाच पवित्रा सर्व नेते घेतात. प्रत्यक्षात मात्र सत्तेचं लोणी आपल्याला किती खायला मिळेल याचाच विचार करतात. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला आणि यांना स्वतःचे अहंकार मोठे वाटू लागले आहेत. जनता खड्ड्यात जात असली तरीही यांना स्वतःची सत्तेची गाडी शाबूत हवी असते.
सामदामदंडभेद इत्यादीने येनकेनप्रकारेन सत्ता मिळवणे व ती कायम आपल्याला व आपल्या कुटुंबियांनाच कशी उपभोगता येईल याचाच सगळीकडे विचार सुरू आहे. अशा लोकांच्या तोंडून लोककल्याणाची भाषा केली जाते तेव्हा हसायला येतं. सत्तेच्या या बाजारात लोकांना मात्र कोणतंही स्थान नाही. एकदा यांच्यावर भरवसा ठेवून, कारण दूसरा चांगला पर्यायही उपलब्ध नसतोच, यांना निवडून दिलं की हे वाट्टेल तो गोंधळ घालायला मोकळे होतात. यांच्या लठ्ठालठ्ठीत राज्याची अवस्था बिकट होवो अथवा लोकांचे प्रश्न भिजत राहोत यांना फरक पडत नाही. चार दिवस एकमेकांना शिव्या घालायच्या, सत्तेसाठी एकमेकांचे गळे धरायचे आणि पुन्हा त्याच सत्तेसाठी कोणाच्याही बाहुपाशांत स्वतःला झोकून द्यायचं. सब घोडे बारा टक्के ही म्हण आजच्या काळाला अगदी चपखल लागू पडते.
सत्ता असो नसो यांनी सात पिढ्यांसाठी कमवून ठेवलं आहे. लोकांचं काय? मागील वर्षांत दीडहजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. करोनामुळे लाखो तरुण बेरोजगार झाले. त्यांनीही आत्महत्या केल्या. कुटुंबासहीत आत्महत्या होत आहेत. शिक्षणाचे धिंडवडे निघत आहेत. करोना पुन्हा परतलाय आणि सरकारचं काय चालू आहे तर सत्ता टिकवण्याची धडपड. यात कोणाचीही सरशी झाली तरी आपला काय फायदा होणार आहे? तो काहीच दिसत नाही. लोककल्याणकारी राज्य हवं, त्यासाठी सत्ता राबवायची असते. प्रत्यक्षात स्वकल्याणकारी राज्य उभारण्यासाठीच सारे नेते धडपडतांना दिसतात.
सत्तेच्या या खेळांत जनता केवळ प्रेक्षक म्हणून उभी आहे. तिची आज करमणूक होत असली तरी त्याने तिचे प्रश्न सुटणार नाहीत. उद्या ती मरत असेल तेव्हा तिला शेवटचं पाणी पाजायलाही ही नेतेमंडळी येणार नाहीत. नेता याचा अर्थ नेणारा असा असतो. पुढारी म्हणजे पुढे नेणारा. पण लोकांना खड्यात घालण्यापलीकडे यांच्या हातून काही काम झालंय असं दिसत नाही. आणि वरून ही लोकशाही आहे असं म्हणायचं. ही केवळ स्वशाही आहे. आणि हे आपलं दूर्दैव आहे. ते इकडे काय तिकडे काय सुखातच राहणार आहेत. लोकांची मात्र सगळीकडेच बिनपाण्यानं हजामत होणार आहे यात शंका नाही.