दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : आंबे फुकट न दिल्याने एका फळ व्यापाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्डाच्या आवारात घडली. या प्रकरणी फईम खान (वय १९), सूरज भिसे (वय १९), करण लोंढे (वय २१), महेश साबळे (१९) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबु कलाम आजाद (वय ३२) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मार्केट यार्डातील आंबेडकर वसाहतीत राहायला आहेत. केळी बाजारात आजाद यांचा गाळा आहे. आरोपी खान, भिसे, लोंढे, साबळे आजाद यांच्या गाळ्यावर गेले. त्यांनी त्यांच्याकडे आंबे मागितले. आजाद आणि त्यांचा भाऊ गाळ्यावर होते. आजाद यांनी आरोपींकडे पैसे मागितले. आरोपींनी वाद घालून पैसै देण्यास नकार दिला. बाजार समितीकडे तक्रार करतो, असे आजाद यांनी आरोपींना सांगितले. आरोपींनी आजाद यांच्या भावाला गजाने मारहाण केली. त्यांच्यावर चाकूने वार केले. मार्केट यार्ड पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे