
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
उदगीर प्रतिनिधी,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे झाडाची सावली, फुलांचा गंध, सूर्याची ऊर्जा, वाऱ्याचा गारवा, पावसासारखे जीवनामृत, आभाळा इतकी माया, धरणी सारखी काया देण्याचे प्रयत्न करतात अशी माणसे म्हणजेच त्यांच्या ठायी असलेली माणुसकी इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची परोपकारी वृत्ती हे सर्व संत तत्वाचे गुण त्यांच्यामध्ये आहेत अशी माणसे म्हणजेच संतत्त्वाच्या पाऊलखुणा होत असे मत शांता गिरबने यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात आयोजित व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सुमित्रा वट्टमवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 267 व्या वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध लेखिका, अभ्यासू वक्त्या शांती गिरबने यांनी स्वलिखित संतत्त्वाच्या पाऊलखुणा या साहित्यकृतीवर संवाद साधताना म्हणाल्या की कुठलाही बोलबाला न करता समाजाची सेवा करत गावात वाचनालय चालू केले, मंदिराचे बांधकाम केले , सर्वांसाठी आंब्याची बाग फुलवली , महारोग्यांच्या सेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची कौटुंबिक आस्था देखील तेवढीच होती. आपली प्रापंचिक कर्तव्य निभावत दुसर्याच्या दुःखात सहभागी होण्याची मानसिकता, महारोग्याच्या सेवेत आनंदाची अनुभूती घेणारे माधवराव यांची कहाणी अत्यंत प्रभावीपणे सादर केले. इतरांच्या कल्याणातच आपलेही कल्याण अशा करुणेने ओथंबलेली माणसे म्हणजेच संत महात्म्याची निशाणी होत. अशी माणसे लोककल्याणार्थ आपले जीवन चंदनाप्रमाणे झिजवतात, इतरांसाठीची त्यागी वृत्ती, करुणेचा भाव, सद्गुणी विचार, निराधारांना दिला जाणारा आधार हे सर्व माधवरावांच्या मध्ये होते. त्याचीच ही कहाणी आपण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे असे त्या म्हणाल्या.
शेवटी अध्यक्षीय समारोपात सुमित्रा वट्टमवार म्हणाल्या की माधवरावांची ही प्रेरणा घेऊन सर्व जण काम करत असतील तर वृद्धाश्रमांची संख्या कमी होण्यास वेळ लागणार नाही. या कार्यक्रमाचे संचलन कु. प्रतिक्षा लोहकरे तर आभार अर्चना नळगीरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम, हनुमंत मेत्रे, भागवत जाधव, मुरलीधर जाधव, राजेंद्र एकबेकर, स्वामी योगेश आदींनी परिश्रम घेतले.