
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
संयुक्त निवेदन
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात नवी दिल्लीत 22 जून 2022 रोजी द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही मंत्र्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला. कोविड-19 चे आव्हान असूनही हे सहकार्य वाढले आहे. हे अधिक वाढविण्याविषयी काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान असलेल्या सर्वंकष राजनैतिक भागीदारीच्या संरक्षण आणि सुरक्षा पैलूंवर चर्चा केली. सामायिक हितसंबंध आणि लोकशाहीची सहकारी मुल्ये, कायद्याचे राज्य, परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित सर्वंकष राजनैतिक भागीदारीची अंमलबजावणीविषयीच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही देशांदरम्यान वाढत असलेल्या विविध संरक्षण कवायती आणि देवाणघेवाण याचे स्वागत केले तसेच भारत – ऑस्ट्रेलिया परस्पर लॉजिस्टीक मदत व्यवस्थेद्वारे क्रियान्वयन करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण संशोधन आणि सामुग्री सहकार्याविषयीच्या भारत – ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्य गटाला (JWG) चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला, ज्याची बैठक या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढविण्यासाठी JWG हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान असलेल्या औद्योगिक सहकार्याविषयी दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. ज्यात पुरवठा साखळ्या अधिक मजबूत करणे आणि आपल्या संबंधित संरक्षण दलांना पूर्ण क्षमतेने मदत करणे याचा समावेश होता. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षणविषयक संबंध आणि संधी यांचा विस्तार करण्याबद्दल सहमती दर्शवली.
‘जनरल रावत युवा अधिकारी आदानप्रदान कार्यक्रम’ या वर्षीचया दुसऱ्या सहामाहीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या 21 मार्च 2022 रोजी झालेल्या आभासी बैठकीत, या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
तसेच, दोन्ही देशांसमोर असलेली रणनीतीक आव्हाने आणि प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आणि एका खुल्या, मुक्त, एकात्मिक, समृद्ध आणि नियमांवर चालणाऱ्या हिंद-प्रशांत महासागर प्रदेशाची उभारणी करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ऑस्ट्रेलियाच्या ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या हिंद-प्रशांत संयुक्त अभ्यासात सहभागी होण्याविषयीची उत्सुकता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
त्याआधी उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन, युद्धातल्या शहीद जवानांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. या द्वीपक्षीय चर्चेपूर्वी, रिचर्ड मार्लेस यांना समारंभपूर्वक औपचारिक मानवंदना देण्यात आली.
रिचर्ड मार्लेस 20 ते 23 जून, 2022 या कालावधीत भारत दौऱ्यावर आले असून, 21 जून ला त्यांनी गोव्याला भेट दिली. यावेळी त्यांनी गोवा शिपयार्ड लिमिटेडचा दौरा केला आणि भारतीय बनावटीच्या ड्रोन विकसन तसेच स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या वाढत्या सामर्थ्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली.