
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे आयोजित योग विषयक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद
उद्या दि. 23 जून पर्यंत प्रदर्शन खुले राहणार
- पुणे : यंदा 21 जून रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग्य दिन साजरा करण्यात आला. यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करत आहोत, यानिमित्ताने भारत सरकारने देशातील 75 ऐतिहासिक विशेष ठिकाणी योगोत्सवाचे आयोजन केले होते.
पुण्यामध्ये आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळी तर, पुण्यात नव्याने सुरु झालेल्या मेट्रो स्थानकावर योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात प्रथमच सुरु झालेल्या दोन मेट्रो मार्गांचे व मेट्रो सेवेचे उदघाटन केले होते. यापैकी पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी मेट्रो स्थानकामध्ये भारत सरकारच्या काही विभागांनी योग दिन साजरा केला.
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, मुंबई; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे व केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय या केंद्र सरकारी विभागांसह पुणे मेट्रो या उत्सवात सहभागी झाले होते.
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी मांडलेल्या चित्र प्रदर्शनाचे देखिल उद्घाटन झाले. योगावर माहिती देणारे हे प्रदर्शन फुगेवाडी मेट्रो स्थानकामध्ये मांडण्यात आले आहे. 21 जून ते 23 जून 2022 या तीन दिवसाच्या कालावधीसाठी हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यास उपलब्ध करून दिले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.
योग हे भारताला मिळालेले एक वरदान आहे. जे भारत संपूर्ण जगाला देऊ पाहत आहे. देशातील नागरिकांनी देखील योग समजून घ्यावा, असा या प्रदर्शनामागील उद्देश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला केलेल्या आपल्या भाषणातून सांगितल्याप्रमाणे योग आपल्या जीवनाचा भाग आहेच, पण तो आपल्या जीवनाचा मार्ग व्हायला हवा. याची सुरुवात योगशी परिचय करून घेण्यापासून होते. योगाबद्दल माहिती घ्यावी, त्याचा अवलंब करावा, तो अविभाज्य दिनक्रम व्हावा आणि काल उद्घाटनाच्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे, आत्मनिर्भर भारत होत असताना त्याचा प्रत्येक नागरिक निरोगी असावा, म्हणून योगदिनाचे औचित्य साधून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाने हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारले आहे.
या प्रदर्शनामध्ये जो एक सामान्य योग अभ्यासक्रम आयुष मंत्रालयाने डिझाईन केला आहे, त्यातील आसनांची माहिती समाविष्ट आहे. यातील आसने जरी, नियमित केली तरी, उत्तम आरोग्य लाभू व टिकू शकते. पवनमुक्तासन,उत्तानपादासन, भुजंगासन, मद्रासन, अर्धचक्रासन, ताडासन अशी सोपी परंतु अत्यंत लाभदायी आसने यामध्ये येतात.
यासोबतच योग व त्याचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या भारतीय योग गुरूची माहिती या प्रदर्शनात आहे. तिरुमलाई कृष्णपार्थ, स्वामी शिवानंद. के. पट्टाभी जॉईस, जग्गी वासुदेव, योगगुरू भारत भूषण, विक्रम चौधरी तसेच महान योग गुरु बी के एस. आयंगार, जे पुण्यामधूनच आपले कार्य करत होते, यासर्वांचा उल्लेख इथे करण्यात आला आहे.
‘योग ‘चे महत्त्व योग करण्यास प्रेरणा देणारी घोषवाक्ये इलेस्ट्रेशनच्या आकर्षक चित्रांमधून येथे योगविषयक माहिती दिली गेली आहे.
केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे अंतर्गत महाराष्ट्र व गोवा मिळून 11 क्षेत्रीय कार्यालयाचे काम करतात. या कार्यलयांनी राज्याच्या विविध भागात 13 मे 2022 रोजी घेतलेल्या योग कार्यक्रमांची माहिती व फोटो देखील या प्रदर्शनात देण्यात आले आहेत. असे माहितीपूर्ण प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांनी चुकवू नये.