
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने 6 जुलैपर्यंत वाढवले आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर यांच्या खंडपीठाने शुक्ला यांच्या विरोधात या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कथित फोन टॅपिंग प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मुंबई पोलिसांना कोणतीही कारवाई करण्यापासून रोखले आहे.
शुक्ला यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोनवर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांनी केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
या वर्षी 4 मार्च रोजी, उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने शुक्ला यांना 25 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेत, पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे.