
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
पेट्रोलपंपाजवळ कार थांबवताच रस्त्याच्या खालून पळत आलेल्या ८ दरोडेखोरांनी औरंगाबादच्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करत लुटले. कोयत्याचे वार करून त्यांना जखमी केले. त्यांचे वडील, आई, पत्नीलाही मारहाण करत दागिने अक्षरशः ओरबडून घेतले. एकूण ६० हजार ९०० रुपयांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. ही थरारक घटना आज, २३ जूनला पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) बीड- औरंगाबाद रोडवरील आडगाव जावळे (ता. पैठण) गावाजवळ घडली.
रवींद्र भास्करराव कुलकर्णी (३८, मयूर पार्क रोड, हर्सूल, दादोजी कोंडदेव शाळेजवळ, औरंगाबाद) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते प्रोझोनमध्ये खाद्यपदार्थाचा व्यवसाय करतात. ते पत्नी, दोन मुली, आई-वडील, दोन नातेवाइकांसह दर्शनासाठी गाणगापूरला मारुती ईको कारने गेले होते. तिथून तुळजापूरला जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि औरंगाबादला परतत होते.
आज पहाटे साडेबाराला (मध्यरात्री) ते आडगाव जावळे गावाजवळ आले. तेथील पेट्रोलपंपाजवळ असलेल्या आयआरबी वॉशरूमजवळ त्यांनी कार थांबवली. कार थांबताच रस्त्याच्या खालून सात ते आठ जण पळत आले. त्यांनी रवींद्र यांना गाडीतून बाहेर ओढत पैसे काढायला सांगितले. रवींद्र यांनी पैसे नाहीत असे सांगितल्यावर त्यांनी ओढत ओढत रोडच्या खाली नेले. तेथे त्यांना पाठीवर, मानेवर, खांद्यावर कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर गाडीकडे येत रवींद्र यांच्या वडिलांवर त्यांनी कोयत्याचे वार केले.
यात वडील जखमी झाले. त्यांच्याकडील ७ हजार रुपये दरोडेखोरांनी हिसकावले. रवींद्र यांच्या आईलाही कोयता मारून गळ्यातील मंगळसूत्र (किंमत २० हजार) हिसकावले. त्यांची पत्नी सौ. वैशाली यांना चापट बुक्क्यांनी मारहाण करत तिचाही मोबाइल हिसकावला. रवींद्र यांचे मामा अनंत कुलकर्णी यांनाही मारहाण करून त्यांच्याकडील रोख ३ हजार ९०० रुपये हिसकावले. दोन मोबाइल, दोन तोळे सोने आणि रोख १० हजार ९०० रुपये असा एकूण ६० हजार ९०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून पळ काढला. रवींद्र कुलकर्णी यांनी पाचोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.