
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर या सगळ्यामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. यातच आता हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का, अशी विचारणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील राजकीय घडामोडींवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला. एक ट्विट करत दीपाली सय्यद यांनी भाजपला काही थेट सवाल केले आहेत. हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी की महाराष्ट्र हितासाठी? अशी विचारणा करत, भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल, असा खोचक टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.