
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: राज्यात शिवसेना आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ‘मुंबई महापालिका निवडणुकांच्या अगोदर अस होणार याची आम्हाला कल्पना होती, अस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आमचा अंदाज असा होता की, मुंबई महापालिकाअगोदर अस काहीतरी होणार. शिवसेनेला संपवून मुंबई महापालिकेवर सरकार आणणे महत्वाचे आहे, यासाठी दिल्लीच्या सूचनेवर हे सगळं करण्यात आले आहे. कारण मुंबई महापालिका सर्वात मोठी महापालिका आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीवरुन आदेश घेऊन येत होते.
या अंदाजामुळे आम्ही सावध होतो, पण त्यांनी मोठा खेळ केला. ईडीचा (ED) वापर करुन आमदारांना फोडले, लोकशाहीला काळीमा लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, अजून या संदर्भात आमच्यात काही चर्चा झालेली नाही.