
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांची हजेरी होती. ही बैठक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, खासदार, आमदार, विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सरकार कसे टिकेल यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे, यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी कुठलीही भूमिका नाही’.
शिवसेनेत काही प्रश्न आमदारांमध्ये निर्माण झालेत, त्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते, नेते सांगतील. काही आमदार परत आले आहेत. नितीन देशमुख, कैलास पाटील असतील, त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकडे जे आमदार आहेत, त्यांना पक्षाकडून परत येण्यासाठी आवाहन केले जात आहे’, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
‘आमची भूमिका आघाडी सरकार टिकवण्यासंदर्भात आहेत. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. काही आमच्यातले मित्रपक्ष वेगळ्या प्रकारचे विधान करत आहेत. मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे, सरकारने अडीच वर्षांत कुठेही निधीत काटछाट केली नाही. सगळ्या प्रकारचा निधी दिला आहे. तरी कशा पद्धतीने वक्तव्ये केली जात आहेत, हे मला माहीत नाही. आमची सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका असते’, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पुढे अजित पवार पुढे म्हणाले, ‘अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील तसेच शिवसेनेचे काही प्रमुख नेते हे एकत्रित असताना बंडखोरीबद्दल सांगितलं असतं तर, गैरसमज दूर झाले असते. आघाडी कशी टिकेल आणि आताची परिस्थिती नीटपणे हाताळता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत’