
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कोलकाता: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरू असतानाच, त्यात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसामऐवजी पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांची चांगली व्यवस्था करू, असा उपरोधिक टोला ममतांनी लगावला. त्याचबरोबर महाराष्ट्रानंतर अन्य सरकारेही पाडतील, असा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदार त्यांच्यासोबत सुरुवातीला थेट सूरतला निघून गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह त्यांचे सर्व समर्थक आमदार हे आसाममधील गुवाहाटीला गेले. या सर्व घटनाक्रमानंतर आसाममध्ये आज, गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केले होते. आता या घटनाक्रमात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे.
एनएनआयच्या वृत्तानुसार, ‘उद्धव ठाकरे आणि सर्वांना न्याय मिळावा असे आम्हाला वाटते. आज भाजप सत्तेत आहे. ते पैसे, ताकद, माफियांची ताकद आदींचा वापर करत आहेत. एक दिवस तुमचाही जाईल. अन्य कोणी तुमचा पक्षही फोडेल,’ असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला.
शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सर्व चुकीचे असून, आम्ही त्याचे समर्थन करू शकत नाही, असे ममता म्हणाल्या. ‘बंडखोर आमदारांना आसामऐवजी पश्चिम बंगालला पाठवा, आम्ही त्यांचे चांगल्यारितीने स्वागत करू,’ असा उपरोधिक टोला त्यांनी भाजपला लगावला.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी खळबळजनक दावा केला. महाराष्ट्र सरकारनंतर ते अन्य सरकारेही पाडतील, असेही त्या म्हणाल्या. लोकांकरिता आणि संविधानासाठी तृणमूल काँग्रेस न्याय मागत आहे, असेही त्या म्हणाल्या.