
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यातील पिंपळशेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील गायकवाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो मागे घेण्यात यावा ह्या मागणीकरिता तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी २१ जून पासून गटविकास अधिकाऱ्यांना कामबंद आंदोलनाचे पत्र देऊन गेल्या चार दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यावेळी पंचायत समिती जव्हार कार्यालयासमोर त्यांनी निषेध नोंदवला.
सविस्तर वृत्त असे की,ग्रामपंचायत कार्यालय पिंपळशेत येथे ग्रामसेवक गायकवाड यांनी मीटिंग बोलावली होती.मीटिंग संपल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने पीडित महिलेला थांबण्यासाठी सांगितले.यावेळी ग्रामसेवक गायकवाड यांनी आपल्याशी असभ्य व गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित महिलेने केलेला असून बुधवारी जव्हार पोलिस ठाण्यात ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेले आहे.दरम्यान मीटिंग संपल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माजी महिला सरपंच प्राची शेंडे यादेखील उपस्थित होत्या.त्यांनी यावेळी असे कोणतेच असभ्य व गैरवर्तन ग्रामसेवक गायकवाड यांनी केले नसल्याची लेखी कबुली दिली होती.
तालुक्यातील ग्रामसेवकांचे सलग चार दिवस कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जून महिन्यात मुलांची शाळा चालू झाल्याने विविध दाखल्यांकरिता ग्रामपंचायतीच्या अनेक दाखल्याची आवश्यकता असते परंतु ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलन असल्याने पालकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे