
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांना धोका दिल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर धडक मारली. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. त्यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणा दिल्या असून तब्बल एक तास शिवसैनिकांचे आंदोलन सुरू होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात हजर केले.
या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, भाग्यनगर पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मालेगाव- नांदेड रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली आहे. आंदोलनात प्रामुख्याने भुजंग पाटील, प्रकाश मारावार, डॉ. मनोज भंडारी, महेश खेडकर, माधव पावडे, जयवंत कदम, उद्धव शिंदे, साई विभुते, शाम वानखेडे, नवज्योत सिंग गाडीवाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.