
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सिल्लोड – महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देविदास पा. लोखंडे यांनी केले आहे.
रविवार ( दि.26 ) रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभे नंतर रॅलीचा समारोप होईल. मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व ना. शिंदे गटातील इतर आमदारांना समर्थन देण्यासाठी सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील ना. अब्दुल सत्तार समर्थकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास पा. लोखंडे यांनी केले आहे.
रॅलीला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ही असणार उपस्थिती
दरम्यान या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ही उपस्थिती असणार आहे. आज सकाळी 10 वाजता शहरातील महाराणा प्रताप चौक जवळील मैदानात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर आयोजित रॅलीत सहभागी होऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रियदर्शनी चौक येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करतील.