
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सिने कलाकार आणि राजकीय नेत्यांबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते. आता राजकीय नेत्यांबाबतच्या वयोमानाबाबत संशोधकांनी नवा शोध लावला आहे. राजकीय नेत्यांचे वयोमान सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असते.
तसेच सर्वसामान्य जनतेतील असमानतेबाबतही त्यांनी मते मांडली आहेत.
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांच्या वयोमानातील अंतर वाढत आहे. 19 व्या शतकाच्या शोवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक देशात राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेचे वयोमान समान होते. मात्र, 20 व्या शतकात मृत्यूदरातील तफावत वाढत गेली, असे संशोधनात दिसून आले आहे.
हे संशोधन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केले असून युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, फ्रान्स,जर्मनी, इटली, नेदरलँड, न्यूझीलँड, स्वित्झर्लंड, युके, अमेरिकेसह 11 देशातील 57,500 जास्त राजकीय नेत्यांच्या माहितीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. संशोधकांच्या पथकाने 1816 ते 2017 मधील सर्व देशातील राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनता यांच्या वयोमानाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
अमेरिकेत सर्वसामान्य जनता आणि नेत्यांमधील सरासरी वयोमानाचे अंतर 7 वर्षांचे आहे. त्यात महिला नेत्यांचे प्रमाण 3 ते 21 टक्के आहे. त्यात महिलांचे वयोमान पुरुषांपेक्षा जास्त असल्याचेही आढळून आले आहे. स्वित्झर्लंडमध्ये सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांच्या वयोमानात सरासरी 3 वर्षांचे अंतर आहे. या अभ्यासावरून राजकीय नेते सर्वसामान्य जनतेपेक्षा जास्त जगतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला सरासरी 50 वर्षांच्या जनतेत धुम्रपानाचे प्रमाण जास्त होते. 1950 नंतर त्यात घट होत आहे. सर्वसामान्य जनतेपक्षा राजकीय नेत्यांमधील धुम्रपान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे 20 व्या शतकात वयोमानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
वयोमानाच्या दरात तफावत होण्यामागे हृदयविकार हे देखील कारण असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. सर्वसामान् जनतेपेक्षा राजकीय नेत्यांचे जीवन तणावाचे असल्याने त्यांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. मात्र, वैद्यक शास्त्रात झालेली प्रगती आणि सुधारणा यामुळे यावर मात करणे शक्य झाले आहे. तसेच राजकीय नेते यावर सहज औषधोपचार करू शकतात. मात्र, अनेकदा याचे औषधोपचार सर्वसामान्यांचे आवाक्याबाहेरचे असतात. त्यामुळे वयोमानात तफावत झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
या सर्वांसह आर्थिक विषमता हेदेखील प्रमुख कारण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. राजकीय नेते आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने राजकीय नेते दिर्घायू आणि स्वास्थपूर्ण जीवन जगू शकतात, असे संशोधकांनी सांगितले.