
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुवाहाटी गाठावी हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. असे अनेक जण आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. गुवाहाटीस जाण्यापूर्वी तूर्तास त्यांना अभय देण्यात आले. आता श्री. किरीट सोमय्या काय करणार? ”माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजप सांगेल ते करतोय,” असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. पाठोपाठ यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या.
गुलाबराव पाटील हे स्वतःस शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पान टपरीवरल्या सामान्य शिवसैनिकास शिवसेनेने आमदार व कॅबिनेट मंत्री कसे केले याची वीरश्रीयुक्त कथने जाहीर सभांतून करतात, पण तेच गुलाबराव पाटील यांना कोणीतरी ईडी कारवाईची पोकळ धमकी देताच ते पळून गेले. संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे 30 वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा त्रास होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय.