
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अकोला : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडते की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या बंडाचा अद्याप शेवट झालेला नाही.
तसेच यावर भाष्य करणारे कमी नाहीत. आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राजकारणावर भाष्य केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड पुकारला आहे. यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आली आहे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढे येत महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे बंड पुकारलेल्या आमदारांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आता हा संघर्ष आणखी किती दिवस चालतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. सोयरीक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिसऱ्याचे आणि गर्भ चौथ्याचा’ अशी सध्याच्या राजकारणाची स्थिती झाल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.
पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज
सध्याची राजकीय परिस्थिती अक्षरशः: वीट आणणारी आहे. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत उपाध्यक्ष काय निर्णय देतात, यावर राजकीय कोंडीचे भविष्य आहे, असे उज्ज्वल निकम पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.