
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: सध्या राज्याच तापलेलं राजकीय वातावरण आणि झपाट्यानं सुरु असलेले बदल यामुळं अनेक चर्चांना उधाणं आली आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आदरांसोबत शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेली ही राजकीय लढाई आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी सेनेतील संघर्षावर भाष्य केलं. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे भावुक झाल्याची माहिती मिळत आहे.
या घडामोडींवर केसरकर म्हणाले होते की, गुवाहाटी येथील बंडखोर आमदार मूळ शिवसेना पक्षावर दावा सांगत असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतही असा संदेश फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हा संदेश जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असल्याच्या बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत.
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद काढण्याचा शिंदेचा डाव आहे, असा मेसेज शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे केलं जात आहे, असं म्हणत त्यांनी लक्ष वेधलं होतं. मात्र या बातम्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री ठाकरे एकनाथ शिंदेंना तूच मुख्यमंत्री हो, असं म्हणाले तेव्हा मात्र एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण मी सांगतोय वेगळं आणि मुख्यमंत्री वेगळंच बोलत आहेत, अशी शिंदे यांची भावना झाली आहे, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, तापलेल्या राजकीय वर्तुळातील घडामोडींचा दिवसेंदिवस वेग वाढला आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने न्यायालयात धाव घेतली असून याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. आता यावर काय सुनावणी होणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे यापूर्वीच अर्ज सादर केले होते. शिवसेनेची ही कृती बेकायदा असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. विधानसभेमधील कृत्यांवर आधारितच आमदारांची अपात्रता ठरते आणि पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल आमदार अपात्र ठरत नाहीत, असा दावा करत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.