
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी होताच त्यांच्या गावाची चर्चा देशभर सुरू झालीय. मात्र, याचदरम्यान द्रौपदी मुर्मू यांच्या गावाचं व्यथित करणारं भीषण वास्तव्य देखील समोर आलंय. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
मुर्मू यांचा ज्या गावात जन्म झाला, त्या डूंगरीशाही गावात देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली. मात्र, अद्यापही वीज पोहोचू शकलेली नाहीय. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरबेडा गावात झाला. या गावाची लोकसंख्या अवघी 3500 इतकी आहे. या गावात दोन वाड्या आहेत. एक बडाशाही आणि दुसरी डुंगरीशाही यापैकी बडाशाहीमध्ये तर वीजेची व्यवस्था आहे. मात्र, अद्यापही डुंगरीशाहीमध्ये वीज पोहोचू शकलेली नाहीय. वीज नसल्यानं येथील नागरिक रात्रीच्या उजेडासाठी रॉकेलच्या दिव्याचा उपयोग करतात. तर, मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागते.
चिदंबरम यांनी ट्विट करून लिहिलंय की, याआधी पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, सर्व गावात वीज पोहोचलीय. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या मूळ गावातच वीज पोहोचू शकली नाहीय. तिथं वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर पावलं उचलत असल्याचं आपण बातम्यांमध्ये पोहतोय. वीज नसलेलं हे एकमेव गाव नाहीय. भारतातील अनेक दुर्गम भागात आणि गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या 75 वर्षात आम्ही जे काही साध्य केलं, ते खरोखरच प्रभावी आहे. परंतु, भारताच्या सर्व भागांमध्ये अत्यावश्यक सेवा पोहोचणं हे नेहमीच प्रगतीचं कामं राहिलंय. तर, दुसरीकडं पंतप्रधानांनी 2004 पर्यंतच्या अतुलनीय कामगिरीची कबुली द्यायला हवी होती आणि त्यांचं सरकार केवळ मागील सरकारांचं काम सुरू ठेवत आहे, असा घणाघातही त्यांनी मोदी सरकारवर केलाय.