
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून, महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणत 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले.
त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापलं असून मोठा गोंधळ उडाला आहे. अशात नुकतीच मातोश्रीवर एक बैठक पार पडल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिगंबर बापुजी पवार पाटील असं नाव सुचवलं होतं. त्यावर आज बैठकीत शिक्कामोर्तब झाला. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नावावर शिक्कामोर्तब केलं.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, बाळासाहेबांचं नाव मी दिलं नाही, दि. बा. पाटील यांच्या नावाला माझा कोणताही विरोध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर याबाबत माहिती दिली. जे नाव दिलं ते एकनाथने दिलं, माझा त्याला विरोध नाही, असंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं अशी प्रकल्पग्रस्तांची इच्छा होती. ती मुख्यमंत्र्यांनी पुर्ण केली. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं गेलं होतं. त्या पत्राच्या विनंतीनुसार त्यांनी कोळी, भंडारी या काही समाजाच्या लोकांना इथे बोलावलं. तुमच्या भावनांचा विचार करुन नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं आज सगळ्यांसमोर जाहीर केल्याचं एका प्रकल्पग्रस्ताने सांगितलंय.