
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे :
भोर, वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागांतील गावांना विजेची भेडसावणारी समस्या कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ध्येयवेड्या तरुणांनी हाती घेतलेला ‘मिशन ऊर्जा’ उपक्रम पूर्णत्वास आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गावकऱ्यांना शाश्वत उर्जेचा प्रकाश मिळणार आहे. वेल्हे तालुक्यातील घेवंडे, गेळगाणी, धोपेखिंड आणि भोर तालुक्यातील चांदवणे गावात प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
या गावांमध्ये धबधब्याचे पाणी साठवण तलावांत साठवून सात ते आठ महिने वीजनिर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पातून वर्षभरात १६ ते २२ हजार किलोवॉट वीजनिर्मितीचे ध्येय निश्यित करण्यात आले आहे. डोंगररांगांतून धबधब्यातून पडणारे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून पाइपाद्वारे वेगाने पाणी सोडून टर्बाइन चालवून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे पॉवरस्टेशन गावातच असून, प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पाची क्षमता ताशी पाच किलोवॉट वीजनिर्मितीची आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ग्रामस्थांना नाममात्र दरामध्ये वितरित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांची उर्जा समिती उपक्रमाचे नियोजन करणार आहे, अशी माहिती ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन’चे अध्यक्ष तन्वीर इनामदार यांनी दिली. या प्रकल्पामुळे गावातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाली आली आहे.
‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन’ची ही मूळ संकल्पना असून, त्यांना पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स, नेटक्रॅकर, इमरीस इंडिया, रोटरी क्लबने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) आर्थिक मदत केली आहे. या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले. या वेळी पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनाली देशपांडे, किर्लोस्कर फाउंडेशनचे भावेश कंसारा, गेळगाणीचे सरपंच रघुनाथ जानकर आणि अनेक गावकरी उपस्थित होते.