
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक ४ ऑगस्टला घेण्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने केली आहे. यात औरंगाबाद तालुक्यातील १, पैठण तालुक्यातील ७, गंगापूर तालुक्यातील २, वैजापूर तालुक्यातील २, खुलताबाद तालुक्यातील १, सिल्लोड तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ज्या गावांत निवडणूक जाहीर झाली तिथे आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, ५ ऑगस्टला मतमोजणी होईल, •अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक
कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुटीमुळे १६ आणि १७ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, मतदान ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट रोजी होईल.