
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमधून बुधवारी (दि. २९ जून) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र शिवसेना खा. संजय राऊत यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानल्याचे दिसत आहे. ‘सत्ता येते, सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!’ असा स्पष्ट उल्लेखही यात त्यांनी केला आहे.
“मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.