
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय कराळे
परभणी: रस्ते, नाल्या, गटारे, दिवा-बत्ती, फुटपाथ, सुलभ शौचालये, समाज मंदीर आदी नागरी सुविधा करदात्या नागरिकांना उपलब्ध करुन देणे हा महानगरपालिका व त्या त्या नगरसेवकांचे कर्तव्य आहे किंबहुना तो नागरिकांचा हक्कच आहे. परंतु आवश्यक अशा नागरी सुविधाही पुरविल्या जात नाहीत. अशा सर्व सुविधांपासून महापालिकेच्या वॉर्ड क्र. १५ मधील नागरिकांना जाणिवपूर्वक वंचित ठेवले जात आहे नव्हे तसे कारस्थान जात आहे. अशा नगरसेवकांनी आगामी निवडणुक काळात मतांसाठी आपले तोंडही दाखवू नये, असा निर्वाणीचा इशारा समस्त नागरिकांनी दिला आहे.
लहान मुलां-मुलींना शाळेत वा अन्यत्र कोठेही जातांना रस्त्यांवर साचलेल्या चिखलातून व पाण्यातून कसरत करावी लागते
त्यातच भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अंगावर व कपड्यांवर घाण पाणी व चिखल उडला जातो परिणामी त्या मुलांना तसेच जावे लागते. वयोवृध्द व ज्येष्ठ नागरिकांना रहदारी करणे अशक्यप्राय होऊन बसते. महिलांची तर भयानक अशी तारांबळ उडली जाते. रस्त्यावर दिवा-बत्तीची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी तर भीतीयुक्त वातावरणात तशीच रहदारी करावी लागते. असंख्य खड्डे व त्यात सांगणारे घाण पाणी, रस्त्यांच्या दोन्ही बाजूने नाल्या किंवा गटारांचा अभाव, दुर्गंधीयुक्त वाहणारे घाण पाणी परिणामी रोगराईला निमंत्रण देणारी दैन्यावस्था, साफ-सफाई व स्वच्छतेचा अभाव, फुटपाथचा अभाव परिणामी त्याच घाणेरड्या रस्त्यावरुन रहदारी करताना व भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून उडणार्या घाण पाण्याचीही पर्वा न करता त्याच रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे भाग पडते.
सुमारे चार ते पाच हजार लोकवस्तीचे कारेगाव परंतु त्या सर्व लोकवस्तीच्या रहदारी साठी सुध्दा हाच एकमेव रस्ता आहे. सुमारे साठ फुट रुंदीच्या दुहेरी रस्त्यांची आवश्यकता असूनही केवळ एकेरी वाहतुकीस लागणारा रस्ताच सध्या तरी अस्तित्वात आहे. पूर्वीचे कारेगाव आता राहिले नसून सलगता परिसर पूर्णतः लोकवस्तीचे आता भरला गेला आहे. परिणामी दहा ते बारा हजारांची लोकवस्ती वाढली गेली परंतु सर्वेक्षणा अभावी त्याचा थांगपत्ता ही महापालिकेला लागला नसावा की काय, जणू अशीच शंका व्यक्त केली जात आहे.
मागील काही कालावधी पूर्वी कारेगावात जाणारया याच रस्त्याचा रुंदीकरण व दुरुस्स्तीसाठी सर्वे झाल्याचे बोलले जात आहे परंतु हक्काच्या नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणात जाणवणारा अभाव पहाता कथित रस्ता रुंदीकरण व दुरुस्स्तीचे काम कधी हाती घेतले जाईल, हे मात्र कमालीचे कठीणच आहे म्हटले तर चुकीचे ठरु नये. निवडणूकीपूर्वी नागरी विकासाची बहुतांश कामे हाती घेतली जातील या वेड्या आशेवर जगणारे हेच करदाते नागरिक आशाळभूत नजरेने नेहमीप्रमाणे हातावर हात चोळत बसतील अशी खात्री कार्यक्षम का अकार्यक्षम नगरसेवकांना नक्कीच वाटले असावे परंतु सुज्ञ जनतेचा उद्रेक आता मात्र पूर्णा अनावर झाला आहे. संतप्त नागरिकांनी मात्र आगामी निवडणुक काळात कोणीही मतांसाठी तोंडं दाखवू नये, असा चक्क निर्वाणीचा इशाराच दिला आहे.
पूर्वीचा १५ क्रमांकाचा हा वॉर्ड आता १७ झाल्याचे कळते. एकूण पाच नगरसेवक या भागातून निवडले जातात असे कळतेय. मग कोणत्याही नगरसेवकांचे लक्ष या भागाच्या विकासासाठी का बरे गेले नसावे की जाणीवपूर्वक टाळले असावे हा खरा सवाल आहे. खरं तर लोकप्रतिनिधींचे ते कर्तव्यच असते परंतु त्यांनी नाही लक्ष दिले तरी त्यांच्या वरिष्ठांनी व महापालिकेशी तरी लक्ष देणे गरजेचे नाही का ठरत ? परंतु ही शोकांतिका कधी आणि कशी दूर करता येईल हा खरा सवाल आहे.नागरिकानाही काही भावना असतात, त्यांचाही हक्क नाही का ? महापालिका आपला कर जसा हक्काने व कायद्याचा इंगा दाखवून वसूल करते तसा नागरिकांनाही सुविधा मिळवण्याचा अधिकार कायद्यानेच प्राप्त झाला आहे हे विसरुन चालणार नाही एवढे मात्र खरे !